Feeds:
Posts
Comments

Archive for the ‘भक्तीरस’ Category

वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना..
तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे!

आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा..
तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे..

येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, “आई”
तुजलाच अर्पितो मी भवदु:ख मम उरीचे..

आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी?
मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे..

आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो!
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे..

Advertisements

Read Full Post »

ज्ञानाचीया डोहा
जाऊ मी कशास,
चरणांची आस
मजलागी |

माऊलीचे प्रेम,
झरा करुणेचा,
गारवा कृपेचा,
पुरेसाहे |

नका घेवू आता
दासाची परीक्षा,
तीच गोड भिक्षा
मज द्यावी |

तुम्हा माझी आण,
पुरवा तहान,
दर्शनास प्राण
व्याकूळले |

राघव

Read Full Post »

आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की!
तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही? Smile

मला भावतो गजर तुझ्या नामाचा-प्रेमाचा..
तुझ्या सगुण रुपात मला निर्गुणाची ओढ!

काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना!
माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर..

कुणा तुझ्यात दिसतो सार्‍या विश्वाचा नियंता..
कुणी तुझ्यात पाहतो काळा दगड केवळ!!

तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच!
सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!

माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली..
तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ!

राघव

Read Full Post »

आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता!

 

मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!

मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?

दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!

अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!

राघव

Read Full Post »

आवाहन

जयालागी ध्यास,
नामाची आस,
कोण श्रीमंत दास,
तयावीण.

भावाची प्रचीती,
राम स्वयें सांगाती,
प्रेमाची महती,
वर्णावी किती!!

रामाचे पायी,
जया चारी धाम,
विचारांचे काम,
तयासी कैसे.

मोजावे कशास
उरलेले दिन,
नामी समाधान,
आनंदी असावे.

राम ठेवी जोवर,
त्याचे असावे तोवर,
अन् निघावे सत्त्वर,
हाक येता!

नामी राहावे मन,
नाम असावे प्राण,
मुमुक्षुचे आवाहन,
सगळ्यांसी.

Read Full Post »

%d bloggers like this: