Feeds:
Posts
Comments

Archive for the ‘प्रेमधुंद’ Category

जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नदी-सागराची घडे भेट साधी..
तरी, अंतरी, छेडते सूर आधी!
शब्दांविना बोलते मूकवाणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

कधी भासती, भास झाले खरे हे!
कधी श्वास माझा उगा अडखळे रे!!
सुखाची दरी, ही अशी जीवघेणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नको रे असा दूर जाऊ सख्या तू..
सुगंधाविना मोगरा पोरका तू..
सांगू कसे, का फुले – रातराणी!!
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

राघव

Advertisements

Read Full Post »

मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..

मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!!

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!

मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!

मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

राघव

Read Full Post »

कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं!
नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!!

कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का?
डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना?
हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं..

वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं!
गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!!
आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं..

ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?
इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण?
त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं..

राघव

Read Full Post »

मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!!

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

राघव

Read Full Post »

%d bloggers like this: