Feeds:
Posts
Comments

Archive for the ‘क्रोधित’ Category

मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

तेच शब्दांचे धुमारे, तीच वेडी आस मजला,
रक्त माझे सांडले पण, अजुन मी झुकतोच आहे.

निष्क्रीयतेच्या दलदलीचा थांग मज लागेल कैसा,
खेळ रुतलेल्या रथांचा* अजुन मी बघतोच आहे.

तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा,
“कडक भाषेची” भलावण अजुन मी करतोच आहे.

प्रिय मजला सख्य “त्याचे”, काळजाचा भाग जैसा!
ओकल्या गरळीस त्याच्या अजुन मी पुसतोच आहे.

शांतवाया आज मजला भाषणे सारेच देती..
भाव लोण्याचा* कळूनही अजुन मी भुलतोच आहे.

कोण ते वेडे? कशाला प्राण त्यांनी फुंकले?
रोज येथे भारताचा आत्मा मरतोच आहे.

(विषण्ण) राघव

* अभिप्रेत अर्थ –
१. रथांचा = मनोरथांचा
२. भाव लोण्याचा = मृतांच्या टाळू वरील लोण्याची किंमत.

Advertisements

Read Full Post »

ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी?
पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी..

का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे?
व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी..

चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे,
एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी..

वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली?
मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी..

पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,
घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी..

शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा,
मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी..

राघव
[*मान: अभिप्रेत अर्थ – अभिमान]

Read Full Post »

%d bloggers like this: