Feeds:
Posts
Comments

Archive for the ‘करूण’ Category

विसंगती..

फुललेल्या पळसाच्या सौदर्याची बात न्यारी!
पण पळसास आस, तेव्हा पानांचीच खरी..

झाड तुटे – तुटे जीव, घरटीही उलथती..
मी, नुसताच बघ्या.. सल लागतो जिव्हारी

विसंगती जीवनास पाचवीला पुजलेली..
कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्या(च) उरी

वादळाचा तिढा, आता कुणी कसा सोडवावा..
पणतीस तेवतांना बघण्याची ईच्छा धरी!

भुकेल्यास अन्न देता मनी नाही समाधान..
हिशेबात पुण्य येई.. अशी मनाची पायरी..

हसू राखतो जरासे.. तडजोड जगण्याशी
पण रोकडे सवाल.. ओघळती गालांवरी

राघव

Advertisements

Read Full Post »

दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते..

नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे?
आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे?

दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे..
स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे?

आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे..
बोलावयास सारे.. पोटात काय आहे?

तू सांग देवराया आता कसा जगू मी..
सारेच फाटलेले ठिगळात काय आहे?

देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला..
तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे?

असतो असाच थोडा पाऊस सांडलेला..
भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे?

पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो..
अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे?

(विषण्ण) राघव

Read Full Post »

या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी. किंचित बदल करून येथे प्रकाशीत करतोय.
आज तो सावरलाय पण त्यावेळचा त्रास सहन करणे त्याच्या सहनशक्ती पलिकडचे झालेले होते.

कसे रोधावे मनास, कसा सांभाळावा ध्यास..
मिणमिणता उजेड अन् अंधाराची कास.

दुःख सर्वत्र गर्दले, कोण कुणाचे कळेना..
तुझ्या सोबतीच्या जागी, दगा करतोय वास.

कसे अफुट उठले दव काळजाच्या पानी..
डोळे आटलेले तळे, थिजे विश्वासाचा श्वास.

दिन-रात एक सारे, विश्व निमाले क्षणात..
काळ थांबला कधीचा, नुरे जगण्याची आस.

————————————-

मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.

प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
घाव पेलण्या दग्याचा जणू घडला अभ्यास.

वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास.

काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला ‘तो’ भास.

राघव

Read Full Post »

%d bloggers like this: