Feeds:
Posts
Comments

Archive for the ‘आशादायक’ Category

ध्येय!

पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. 🙂

आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज,
भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे!

अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!

कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!

प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे!

कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!

राघव

Advertisements

Read Full Post »

चार मायेचे उत्साहाचे शब्द निराश मनाला शांत करण्यास उपयोगी पडतातच. उभारीची ताकद तर पंखात असतेच. जाणिव फक्त परत व्हावी लागते.

अजुनी उदास का रे बोलावयास काही?
की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही?

नेहमीच सुर्य दिसतो अस्ताचलास तुजला..
चैतन्य जागवाया, उदयात शोध काही!

पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही!

घे कुंचला मनाचा रेखावयास जगणे
रंगांत डुंबणारे उरले अजून काही!

ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!

प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे..
स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!!

शुभम्

Read Full Post »

या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी. किंचित बदल करून येथे प्रकाशीत करतोय.
आज तो सावरलाय पण त्यावेळचा त्रास सहन करणे त्याच्या सहनशक्ती पलिकडचे झालेले होते.

कसे रोधावे मनास, कसा सांभाळावा ध्यास..
मिणमिणता उजेड अन् अंधाराची कास.

दुःख सर्वत्र गर्दले, कोण कुणाचे कळेना..
तुझ्या सोबतीच्या जागी, दगा करतोय वास.

कसे अफुट उठले दव काळजाच्या पानी..
डोळे आटलेले तळे, थिजे विश्वासाचा श्वास.

दिन-रात एक सारे, विश्व निमाले क्षणात..
काळ थांबला कधीचा, नुरे जगण्याची आस.

————————————-

मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.

प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
घाव पेलण्या दग्याचा जणू घडला अभ्यास.

वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास.

काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला ‘तो’ भास.

राघव

Read Full Post »

मागे नागपूरला असतांना उन्हाळ्यात एकदा भर दुपारी अमरावतीला जाण्यासाठी प्रवास करावा लागला. मधे रस्त्यात एके ठिकाणी पळस फुलल्यामुळे लालेलाल झालेली झाडांची रांग लागली! इकडे कडक उन्हामुळे जीव हैराण झालेला होता. पाण्यालासुद्धा तहान लागावी अशी वेळ होती ती!! सगळ्या बाजूंनी धरणी साद घालतेय पावसासाठी असे वाटत होते.
अन् त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडला वळवाचा.. जोरदार! त्या पावसानंतर इतके छान वाटले की वर्णन नाही करता येणार.
त्यावेळेस स्फुरलेल्या ह्या काही ओळी.. नंतर कधी समर्पक अशी भर घालता आली नाही त्यात!

निसर्गाचा खेळ सारा..
कधी मोठा अजब वाटतो!
पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!!
..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं!

सतत जवळ असलेलं आभाळ
धरतीहून दुरच दिसतं..
पण, तापल्या धरतीला शांतवण्यासाठी
आभाळाला बरसावं लागतं..
जणू आभाळाच्या अवस्थेचं प्रतिबिंब धरतीवर उमटतं..
..आभाळाचं धरतीशी नातंच काही और असतं!

धरतीच्या कुशीत
आभाळाच्या पांघरूणात
मनातली द्वंद्वही शांत होतात..
..आई-वडीलांच्या मायेचं नातंच काही और असतं!!

मुमुक्षु

Read Full Post »

%d bloggers like this: