Feeds:
Posts
Comments

जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नदी-सागराची घडे भेट साधी..
तरी, अंतरी, छेडते सूर आधी!
शब्दांविना बोलते मूकवाणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

कधी भासती, भास झाले खरे हे!
कधी श्वास माझा उगा अडखळे रे!!
सुखाची दरी, ही अशी जीवघेणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नको रे असा दूर जाऊ सख्या तू..
सुगंधाविना मोगरा पोरका तू..
सांगू कसे, का फुले – रातराणी!!
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

राघव

Advertisements

मन!

मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..

मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!!

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!

मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!

मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

राघव

प्रशांतच्या कल्पना मुळातच खास! शब्दबंधची संकल्पनाही तशीच अन पाऊस-कवितांचीही अशीच. क्रांतीताईंनी मला खो दिलाय. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिलेले आहेतच. माझी साखळी जोडतोय..

नियमावली:

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, “पाऊस-कविता” पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम –
१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. 🙂 आता फक्त पाऊस-कविता….


मग करायची‌ सुरुवात?
माझं कडवं – (भुजंगप्रयात छंद)


न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

माझा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

क्रांतीताईंचे उत्तर:

छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

माझी साखळी:

निळ्या-काळ्या आभाळाला धरतीची हाक –
“बरस ना रे, मला चिंब भिजवून टाक!”
“ओलसर साथ तुझी..आभाळ मी न्हायलेली..”
..पुलकित काया माझी होऊ दे निर्वाक्‌!!”

छंद मात्र मला अजिबात समजत नाहीत.. त्याबद्दल क्षमस्व!

माझा खो अदिती, नी, गंगाधर काका आणि अरुंधती यांना..!! 🙂

राघव

फुललेल्या पळसाच्या सौदर्याची बात न्यारी!
पण पळसास आस, तेव्हा पानांचीच खरी..

झाड तुटे – तुटे जीव, घरटीही उलथती..
मी, नुसताच बघ्या.. सल लागतो जिव्हारी

विसंगती जीवनास पाचवीला पुजलेली..
कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्या(च) उरी

वादळाचा तिढा, आता कुणी कसा सोडवावा..
पणतीस तेवतांना बघण्याची ईच्छा धरी!

भुकेल्यास अन्न देता मनी नाही समाधान..
हिशेबात पुण्य येई.. अशी मनाची पायरी..

हसू राखतो जरासे.. तडजोड जगण्याशी
पण रोकडे सवाल.. ओघळती गालांवरी

राघव

दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते..

नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे?
आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे?

दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे..
स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे?

आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे..
बोलावयास सारे.. पोटात काय आहे?

तू सांग देवराया आता कसा जगू मी..
सारेच फाटलेले ठिगळात काय आहे?

देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला..
तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे?

असतो असाच थोडा पाऊस सांडलेला..
भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे?

पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो..
अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे?

(विषण्ण) राघव

कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं!
नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!!

कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का?
डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना?
हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं..

वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं!
गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!!
आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं..

ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?
इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण?
त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं..

राघव

ध्येय!

पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. 🙂

आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज,
भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे!

अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!

कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!

प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे!

कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!

राघव

%d bloggers like this: